
*राष्ट्रीय स्तरावरील मोटीवेशनल स्पीकर, एज्युकेशनल advisor सदाशिव पांचाळ यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष सन्मान*तळेरे(प्रतिनिधी-गुरुनाथतिरपणकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे (तालुका कणकवली) येथील राष्ट्रीय स्तरावरील मोटीवेशनल स्पीकर, एज्युकेशनल advisor सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांच्या गेल्या 20 वर्षाच्या काळात केलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या आदर्श व्यापारी संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, उपसरपंच संदीप घाडी, माजी सभापती दिलीप तळेकर, अमोल सोरप आदी मान्यवर उपस्थित होते. जगप्रसिध्द एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना अलीकडेच पुणे येथील फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर यांच्याकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2026 देऊन पुणे येथील विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले. सदाशिव पांचाळ हे २००३ पासून शिक्षक नसतानाही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, सातारा, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यांत जाऊन विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले आहे. परदेशातही अनेक विद्यार्थी (चौकट)लॉकडाऊन नंतर ऑनलाईन पध्दतीने दुबई, मलेशिया, सिंगापूर, दोहा, कतार, अबुधाबी, नेदरलँड, साऊदी अरेबीया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड अशा विविध देशांतील विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले आहे. आजही असंख्य विद्यार्थी आणि पालक पांचाळ सरांचे मार्गदर्शन घेतात. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून सदाशिव पांचाळ यांनी “पाढ्यांची कार्यशाळा” या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत एक लाख पेक्षा अधिक मुलांना विनामूल्य मार्गदर्शन करत जगाच्या कानाकोपऱ्यात नावलौकीक मिळवले आहे. त्यांचा “बुध्दिबळ” हा मुलांच्या बौध्दिक क्षमता विकसित करणारा कार्यक्रम आज खुप चालतो आहे. यात विद्यार्थी आणि पालक यांचा समावेश तर असतोच, पण या कार्यक्रमाचे कौतुक अनेक डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर तसेच अमेरिकेत विविध विषयांचे पेटंट असलेले वैज्ञानिक अतुल नाईक यांनीही केले आहे. सदाशिव पांचाळ यांना यापुर्वीही विविध संस्थांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले आहे.
