


मेढा गावचा सुपुत्र श्रेयस पराडकर जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित
रोहा ( शैलेश गावंड)
रोहा तालुका मधील मूळ मेढा गावचे रहिवासी असलेला चि. श्रेयस वृषाली दिपक पराडकर याने जलतरण या क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल त्याला “उत्कृष्ट खेळाडू (दिव्यांग)” या जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रेयसला रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा गौरवपूर्ण सोहळा अलिबाग येथील पोलीस मुख्यालय कार्यालयात, संपन्न झाला. यावेळी माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. प्रकाश वाघ हेही उपस्थित होते.
रोह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे श्रेयसने दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी मालवण येथील चिवला समुद्रकिनारी पार पडलेल्या १५ व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी एक किलोमीटर जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले. त्याने ही स्पर्धा अवघ्या ९ मिनिटे ५० सेकंदांत पूर्ण करत स्पेशल स्पर्धक गटात नवा वेळेचा विक्रम प्रस्थापित केला. या गटात प्रथमच असा विक्रम नोंदवला गेला असून, या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्रेयसचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी श्रेयसने प्रथमच फिनस्विमिंग दोन किलोमीटर या नवीन प्रकारच्या सागरी स्पर्धेत सहभाग घेत आठवा क्रमांक मिळवला आणि ही आव्हानात्मक स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत फिनिशर मेडल पटकावले.
तसेच १४ डिसेंबर 2025 रोजी श्रेयसने पाच किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत सहभाग घेत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून आणखी एक फिनिशर मेडल मिळवले.
श्रेयसच्या या यशामागे जे. एम. राठी शाळेचे जलतरण प्रशिक्षक श्री. भूषण शिर्के सर व सहप्रशिक्षक श्री. भूषण म्हात्रे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मेहंदळे हायस्कूल, रोहा येथील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक श्री. मोसे सर, ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था, रोहा येथील अध्यक्ष व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
याशिवाय स्पेशल ऑलिंपिक भारत संस्थेचे पदाधिकारी श्री. धनंजय पाठारे सर व श्री. अभिजीत तांबे सर यांचेही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्याला मिळाले.
श्रेयस पराडकरच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
