
रोहा शहरातील बांधकाम व्यावसायिकाच्या बोगस जाहिरातीला चाप लावा; ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाईची मागणी
रोहा/समीर बामुगडे/
रोहा शहरात काही बांधकाम व्यावसायिकांकडून प्रकल्पाच्या जाहिराती करताना प्रत्यक्षात उपलब्ध नसलेल्या सुविधांचे फोटो व माहिती वापरली जात असल्याचा आरोप पुढे आला आहे. जाहिरातींमध्ये पार्क, जिम, खेळाचे मैदान तसेच इतर आकर्षक सुविधा दाखवून ग्राहकांना घर घेण्यासाठी आकर्षित केले जाते; मात्र प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी पाहणी केल्यानंतर या सुविधांबाबत वास्तव वेगळे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
विशेषतः जाहिरातींमध्ये दाखविण्यात येणारा पार्क आणि जिम प्रत्यक्षात उपलब्ध नसल्यास किंवा त्याची सुविधा अद्याप निर्माण केलेली नसल्यास, अशा जाहिरातींमुळे ग्राहकांची थेट दिशाभूल होण्याची शक्यता आहे. घर किंवा सदनिका खरेदी करताना ग्राहक मोठी आर्थिक गुंतवणूक करतात. त्यामुळे जाहिरातीत दाखवलेल्या सुविधा आणि प्रत्यक्ष प्रकल्पातील सुविधा यामध्ये तफावत असल्यास ग्राहकांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊ शकते.
बांधकाम प्रकल्पाच्या जाहिरातींमध्ये नेमकी आणि वस्तुस्थितीवर आधारित माहिती देणे आवश्यक आहे. भविष्यात उपलब्ध होणाऱ्या सुविधांचे चित्र दाखवायचे असल्यास त्या सुविधा प्रस्तावित आहेत की प्रत्यक्ष उपलब्ध आहेत, याची स्पष्ट माहिती जाहिरातीत देणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात सुविधा नसताना त्या उपलब्ध असल्याप्रमाणे जाहिरात करणे गंभीर बाब ठरू शकते.
या प्रकारच्या जाहिरातींमुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी असल्यास संबंधित प्रकल्पाच्या जाहिराती, मंजूर आराखडा, प्रत्यक्ष उपलब्ध सुविधा आणि ग्राहकांना देण्यात आलेली माहिती यांची संबंधित प्राधिकरणाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या भ्रामक जाहिराती होणार नाहीत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्राहकांनीही केवळ जाहिरातींवर विश्वास न ठेवता प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करावी, मंजूर कागदपत्रे आणि सुविधांची माहिती तपासावी. दरम्यान, रोहा शहरातील बांधकाम प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये दाखवण्यात येणाऱ्या सुविधांची वस्तुस्थिती तपासून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप लावण्याची मागणी जोर धरत आहे.
