
सदू मोकाशी मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चौकशीसाठी पुढाकार
प्रतिनिधी मंडणगड
मंडणगड : सर्वज्ञ कात कारखान्यात कामगार सदू सखाराम मोकाशी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने परिसरात चर्चेला उधाण आले असून, आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मोकाशी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, या प्रश्नाचे उत्तर निष्पक्ष आणि पारदर्शक तपासातून समोर यावे, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मृत्यूची चौकशी कोणत्याही दबावाला किंवा अफवांना बळी न पडता पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने करण्यात यावी, अशी भूमिका समितीने घेतली आहे.
या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि उपलब्ध तपशील समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर समितीने हे तपशील अलिबाग येथील नितीन राऊत तसेच जबाबदार सहकाऱ्यांकडे पाठविल्याचे सांगितले आहे. संबंधितांकडून या प्रकरणात आतापर्यंत काय कार्यवाही झाली, याची माहिती घेऊन पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता समितीच्या पुढाकारामुळे तपासाच्या दिशेने काही ठोस हालचाल होणार का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मोकाशी यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आणण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कामगारांची हजेरी नोंद, शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवाल यांची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासादरम्यान उपलब्ध प्रत्येक वैज्ञानिक आणि तांत्रिक पुराव्याचा बारकाईने अभ्यास होणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवरील तपासाबाबत समाधान नसेल, तर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे, सीआयडीकडे किंवा विशेष तपास पथकाकडे सोपवावा, अशी मागणीही समितीने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अफवा, अंधश्रद्धा किंवा कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता केवळ वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मांडली आहे. सदू मोकाशी यांच्या मृत्यूचे नेमके सत्य बाहेर येणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. तपासात कोणाचीही भूमिका दोषी आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणाची पुढील चौकशी कोणत्या दिशेने घेते आणि संशयास्पद मृत्यूमागील सत्य कधी समोर येते, याकडे मंडणगडसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
