

रोह्यात पुराचा कहर; सलग तीन दिवस जनजीवन ठप्प,
कुंडलिकेच्या महापुराने शहरासह तालुका जलमय; गावागावांचा संपर्क तुटला, वीज-नेटवर्क खंडित, शेतीचे कोट्यवधींचे नुकसान
रोहा … महेश मोहिते
सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रोहा शहर व तालुक्याला अक्षरशः वेढा घातला आहे. कुंडलिका नदीच्या महापुरामुळे शहरातील अनेक सखल भागांसह नदीकाठावरील गावे पाण्याखाली गेली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबांना घरातच अडकून राहावे लागले, तर काहींना काळोखात आणि पुराच्या भीतीत रात्र काढावी लागली.
महापुरामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दूध, किराणा, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू मिळविण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू आहे.
रोहा-अष्टमी शहरातील शाळा व महाविद्यालये सलग तीन दिवस बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. घराबाहेर पडता येत नसल्याने शाळकरी मुले घरातच अडकून पडली आहेत. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कामासाठी जाणाऱ्या हजारो कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक कालवे पलटी झाल्याने भातशेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
या अभूतपूर्व परिस्थितीत रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, गटनेते महेंद्र गुजर तसेच सर्व नगरसेवक, NVSSR टीम,पालिका अधिकारी व कर्मचारी बचाव आणि मदतकार्यात दिवसरात्र कार्यरत आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने रोहा तालुक्यात भीतीचे वातावरण असून नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांच्या या पुरामुळे झालेले आर्थिक नुकसान मोठे असून परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
