

**रोहा हादरले! प्रेमसंबंधातून २० वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या, मुख्य आरोपी तरुणाचीही आत्महत्या*
** महेश मोहिते.रोहा प्रतिनिधी.**
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. रोहा तालुक्यातील निडी गावात प्रेमसंबंधातून एका २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्यानंतर तरुणानेही स्वतःचे आयुष्य संपवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या दुहेरी घटनेमुळे निडी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. मृत तरुणी आणि आरोपी तरुण यांच्यात प्रेमसंबंध होते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. सोमवारी रात्री त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या वादाचे रूपांतर अत्यंत टोकाच्या पाऊलात झाले. संतापलेल्या तरुणाने २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून तिचा खून केला.तरुणीचा मृत्यू झाल्याचे समजताच घाबरलेल्या आणि पश्चात्ताप झालेल्या आरोपी तरुणानेही घटनास्थळी स्वतःचे आयुष्य गळफास लावून संपवले. एकाच वेळी घडलेल्या या हत्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे परिसरातील नागरिक सुन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने निडी गावात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी जवळच्या रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या दोघांमध्ये नेमका वाद कशामुळे झाला? आणि हत्येमागचे मुख्य कारण काय, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून गावातील प्रत्यक्षदर्शींची आणि नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.
