








JSW संजीवनी हॉस्पिटलचा आरोग्यदायी उपक्रम; धेरंड येथे २१ जणांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया
रायगड – अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत शहापूर अंतर्गत धेरंड येथे JSW संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरादरम्यान सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह नेत्रतपासणी, रक्तदाब, मधुमेह आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक रुग्णांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या निदर्शनास आल्या. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आलेल्या २१ रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.JSW संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरची आवश्यक काळजीही घेतली. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभण्याची संधी मिळाली आहे.स्थानिक ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी JSW संजीवनी हॉस्पिटलच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे स्वागत करत आभार व्यक्त केले. भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. हा उपक्रम ग्रामीण आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
