

अलिबागला आयटी कौशल्यांचे केंद्र बनवण्याचा संकल्प
– दिलीप भोईररायगड
– अमुलकुमार जैन
दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा मिळावी या उद्देशाने श्री. दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट, झिराड आणि उत्कर्ष फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग-रेवदंडा बाह्यवळणावरील हॉटेल सन्मान येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद सदस्य दिलीप (छोटम शेठ) भोईर, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, शिवसेना शहरप्रमुख विकास कर्णेकर, उत्कर्ष फाऊंडेशनचे दिलेंद्र शिलधनकर, संतोष म्हात्रे, वैशाली भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना दिलीप भोईर यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात यश आल्याचे सांगत, भविष्यात हजारो विद्यार्थ्यांना मोफत आयटी सॉफ्टवेअर प्रशिक्षण देऊन अलिबागला आयटी कौशल्यांचे केंद्र बनवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी जाहीर केले.निवृत्त मुख्याध्यापिका वैशाली भिडे यांनी भोईर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. उत्कर्ष फाऊंडेशनचे दिलेंद्र शिलधनकर यांनी संस्थेमार्फत १२५ हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याची माहिती देत, आगामी काळात दरवर्षी ५०० विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. शिबिरात विद्यार्थ्यांना करिअरचे विविध पर्याय, कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
