
*मंत्र्यांच्या खाजगी* *सचिवांचा भ्रष्टाचार*
*आदिती तटकरेंच्या खाजगी सचिवावर राजपत्रीत अधिकारी संघटनेचे गंभीर आरोप*
मंत्री आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मंत्रीपदच ‘बोली लावून’ मिळवलेले असल्याने दिलेले पैसे दामदुपटीने वसूल केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मंत्री भ्रष्टाचार करतातच. एखाद दुसरा अपवाद वगळता ‘हमाम मे सब नंगे.’
याच भ्रष्ट मंत्र्यांच्या नावावर स्वतःची तुमडी भरण्यासाठी त्यांचे खाजगी सचिव होण्यासाठी अधिकाऱ्यांमधे मोठी स्पर्धा लागते. एकदा का हे पद मिळालं की, पैसाच पैसा ही त्यांची धारणा असते. खोऱ्याने पैसा ओढता येतो. पद मिळाल्यानंतर पूर्ण मंत्रिपदाचा ‘व्यवहार’ हा त्यांच्याच हातात असतो. त्यातूनच मग बदल्या – बढत्या, टेंडर, चौकशी आणि इतर बरचसं काही – काही करून बक्कळ पैसा मिळवता येतो. अर्थातच या सर्व भ्रष्टाचाराला मंत्र्यांचा आशिर्वाद असतोच असतो. मंत्री सांगतात, ते खाजगी सचिव करतातच पण मंत्र्यांच्या नकळतही बरेच ‘व्यवहार’ केले जातात.
सध्या मंत्रालयामधे जे सुरू आहे ते भयावह आहे. कधी नव्हे तो खुल्लम – खुल्ला भ्रष्टाचार सुरू आहे. जनतेचा संताप वाढतो आहे. त्यातच आता राजपत्रीत अधिकाऱ्यांची भर पडली आहे. भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला म्हणूनच आता खाजगी सचिवांवर आरोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. अनेक सचिव व खाजगी सचिव हे आरोपींच्या पिंजऱ्यामधे आहेत. त्यातच राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या संघटनेने महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रीत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी राजेश गायकवाड यांच्यावर वेगवेगळे आरोप करत मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केल्याने राजेश गायकवाड हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या निमित्ताने खाजगी सचिवांच्या ‘ व्यवहारांची ‘ चर्चाही चव्हाट्यावर आल्याने मंत्रालयामधील भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण आले आहे.
श्री. भोसले यांनी केलेल्या तक्रारीमधे श्री. गायकवाड हे पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा तसेच आर्थिक व्यवहार आणि ‘ ब्लॅकमेलिंग ‘ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोपांची चौकशी करून त्यांना तातडीने पदावरून दूर करण्याची माहिती त्यांनी आपल्या तक्रारीमधे केली आहे. या विभागामधे श्री. गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबाबत असंतोष आढळल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
राजेश गायकवाड हे सलग साडेसहा वर्षांपासून महिला व बालविकास विभागामधे मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या काळामधे सरकार बदलले, तीन मंत्री बदलले तरी ते याच विभागामधे राहाण्यात यशस्वी ठरले, हे विशेष. ते तिन्ही मंत्र्यांचे ‘खासमखास’ होते. त्यांचे सर्व ‘व्यवहार’ हेच पाहत होते. त्यांचा एकूणच ‘व्यवहार’ पाहता ते मंत्र्यांच्या खास मर्जीतले होतात व त्यानंतर लूटमार करतात, हा खात्यामधील कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.
श्री. गायकवाड हे अधिकाऱ्यांवर नियमबाह्य कामांसाठी दबाव आणतात. महिला अधिकाऱ्यांशी असभ्य व अपमानास्पद वर्तन करतात, तसेच अश्लील व अवमान कारक भाषेचा वापर करतात, असेही आरोपी या तक्रारीमधे करण्यात आले आहेत. काही प्रकारांमधे प्रशासकीय कारवाईची भीती दाखवून अधिकाऱ्यांवर मानसिक दबाव निर्माण केला जातो तसेच बदल्या आणि प्रतिनियुक्ती प्रक्रियेमधे हस्तक्षेप करून समांतर यंत्रणा उभारल्याचाही आरोप तक्रारीमधे केला आहे. गेली साडेसहा वर्ष एकाच विभागात असल्याने श्री. गायकवाड यांनी या विभागाचा पूर्ण ताबा घेतला आहे. त्यातुनच त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
त्यांच्या विरोधात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना जाणून-बुजून त्रास देणे, नियमबाह्य कृतींना विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रतिकुल पदस्थापना देण्याचा प्रयत्न करणे. अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी असल्याच्या धमक्या देत त्यांना ‘ब्लॅकमेल’ करणे अनेक प्रकरणांमधे कोट्यावधी रुपयांच्या मागण्या करणे, असे प्रकार या विभागामधे सर्रास घडत आहेत. या सर्व आरोपांचे इलेक्ट्रॉनिक पुरावेही उपलब्ध आहेत, असा दावा संतोष भोसले यांनी आपल्या निवेदनामधे केला आहे.
या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून श्री. गायकवाड यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र तसे होणार नाही. गेली साडेसहा वर्ष एकाच विभागामधे त्यांना ज्यांनी ठेवलेय, तेच यांचे ‘ गॉड फादर ‘ आहेत. त्यांच्या ‘खास मर्जीतले’ ते आहेत, त्यामुळे श्री. गायकवाड यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. उलट आरोप करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मंत्रालयामधे भ्रष्ट मार्गाने पैसे वसूल करून देणाऱ्यांची चलती आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना अभय आहे. म्हणूनच कुठल्याच भ्रष्टाचाराच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. एकूणच कारभार भ्रष्ट पद्धतीने सुरू आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार करण्याची हिम्मत महिला व बालविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दाखवली, तशीच हिम्मत जर इतर विभागीय अधिकाऱ्यांनी दाखवली तर खाजगी सचिवांचे मोठे कांड बाहेर येईल. त्यांच्याबरोबर त्यांचे मंत्रीही अडकतील. मंत्री अदिती तटकरे यांच्या खाजगी सचिवांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्यानंतरही दखल न घेतली गेल्याने राजपत्रीत अधिकाऱ्यांमधे संतापाचे वातावरण आहे. तसं पाहिलं गेलं तर या एकाच विभागामधे भ्रष्टाचार आहे, असे नाही तर सर्वच विभागांमधे मंत्र्यांच्या बरोबर असणारे काही अधिकारी खोऱ्याने पैसे ओढत आहेत. आता भ्रष्टाचाराची गंगोत्री मंत्रालयातूनच वाहत असल्याने गाव – खेड्यातील शासकीय नदी – नालेही भ्रष्टाचाराच्या प्रवाहामधे ओसंडून वाहत आहेत. खालपासून – वरपर्यंत भ्रष्टाचार अखंड सुरू असल्याने राज्यातील जनतेमधे प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा भडका उडाला, तर मात्र त्याची झळ मंत्र्यांना बसल्याशिवाय राहणार नाही.
*• शरद यशवंत पाटील* *पत्रकार, वाडा,* *जि. पालघर* *(M) 860001111*ँ
